🔷मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या टोकापासून जुहू - वेसावे जोड रस्त्या पर्यंत जेव्हीपीडी (जुहू - विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम) उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.
🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी या पूल प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, कामाची प्रगती, वाहतूक बदल आणि बांधकाम पूर्ण करण्याची कालमर्यादा याबाबत आढावा घेत विविध निर्देश दिले.
🔷जेव्हीपीडी उड्डाणपुलाची लांबी १,७५० मीटर (१.७५ किलोमीटर) असून रुंदी १५.१० मीटर आहे. प्रकल्प पूर्णत्वाचा निर्धारित कालावधी दिनांक ३१ मार्च २०२८ पर्यंत आहे. मात्र, दिनांक ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत पूल प्रकल्प सुरू करण्यात यावा, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
🔷उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ६०० मिलीमीटर आणि ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांचे सुमारे ४०० मीटर लांबीमध्ये स्थलांतर करणे, १,२०० मिलीमीटर व्यासाच्या मलवाहिनीचे सूक्ष्म बोगदा तंत्रज्ञान (Microtunneling) पद्धतीने स्थलांतर करणे, ३०० मिलीमीटर व्यासाची मलवाहिनी स्थलांतरित करून नव्याने टाकणे आणि मेट्रो मार्गिका २ बीच्या कामाशी समन्वय साधून उड्डाणपुलाचे बांधकाम करणे ही या प्रकल्पातील प्रमुख आव्हाने आहेत.
🔷याखेरिज, मेट्रो स्थानकाखाली गर्डर बसविण्यासाठी त्यांना आडव्या दिशेने सरकविण्याच्या विशेष तंत्राचा वापर करणे, ९० फूट जंक्शन येथे ७२ मीटर लांबीचा कमानीच्या आकाराचा पूल (Arch Bridge) उभारणे हे महत्त्वाचे अभियांत्रिकी आव्हान आहे. जुहू सर्कल परिसरात कमीत कमी खांब उभारावे लागतील, अशा पद्धतीने विशेष लांबीचा स्पॅन तयार करणे, हे देखील महत्त्वाचे काम आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रकल्पाची ३ टप्प्यात विभागणी करावी. त्यासाठी स्वतंत्र चमू (Team) नेमावा. समांतरपणे कामे पूर्ण करावीत, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर म्हणाले की, पश्चिम उपनगरातील रस्ते संपर्क अधिक सुलभ करणे आणि प्रमुख चौकांवरील वाहनांचा ताण कमी करणे, हा या पूल प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. प्रस्तावित वेसावे - वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई किनारा रस्ता (उत्तर) दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पाच प्रमुख वाहतूक जंक्शन टाळता येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गर्दीच्या वेळेत सध्या सुमारे ४५ मिनिटे लागणारा प्रवास २० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. एकूणच जेव्हीपीडी उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर जुहू, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा परिसरातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
🔷प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे यांच्या सह अभियंते, अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi